दानवे-खोतकर यांच्या अलिंगनावर नेटकरी भिडले! नेत्यांच्या गळाभेटीनंतर सोशल मीडियावर रंगले वाक्युद्ध

Foto
आठवडाभरापूर्वी एकमेकांच्या विरोधात जोर-बैठका काढणार्‍या जालना जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांनी एका आरोग्य शिबिरात दिलजमाई करीत निरोगी राहण्याचा निर्धार केला. नेत्यांनी गळाभेट घेतली असली तरी कार्यकर्त्यांचे ‘आरोग्य’ मात्र बिघडले आहे.  कालपासून सोशल मीडियावर सेना-भाजप कार्यकर्त्याचे घमासान सुरू असून ‘एकच साहेब रावसाहेब...एकच साहेब खोतकरसाहेब...’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. त्यामुळे नेत्यांची दिलजमाई झाली तरी कार्यकर्त्यांचे त्यांचे ‘दिल’ अजूनही घायाळच आहे, असे दिसते.

 भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांना ‘मास लीडर’ म्हणून ओळखले जाते. केंद्रात मंत्रीपद मिळाल्यानंतर भाजपच्या धुरिणांनी जनतेची नाडी तुटू नये म्हणून काहीजणांवर खास वेगळी जबाबदारी दिली. त्यात रावसाहेब दानवे पाटलांचा समावेश होता. ग्रामीण जनतेची पक्‍की नस ओळखणारा हा नेता ‘चकवा’ देण्यासाठी म्हणूनही परिचित आहे. खा.दानवे यांचे राजकारण भल्याभल्यांना कळलेले नाही. त्यामुळेच कार्यकर्तेही दादांच्या चमत्काराला झुकून सलाम करतात. गेल्या वर्षभरापासून शिवसेनेचे नेते व पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी खा.दानवे थेट भिडले. आव्हान-प्रतिआव्हानांनी तणाव शिगेला पोहोचला. पारध रस्ता खोतकर यांनी करून दाखवावा, मी राजकारण सोडेन, अशी प्रतिज्ञा केल्यानंतर खोतकर यांनी हा रस्ता तयार करून दानवेंच्या संन्यासाची वाट बघितली. मात्र, तसे काही झाले नाही. विशेष म्हणजे खोतकरांनीही फारसे ताणले नाही. या दोन दिग्गज नेत्यांमधील वाक्युद्ध राज्यभर गाजले. जालना जिल्ह्यात भाजप-शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामार्‍या झाल्या, अगदी जीवघेणे हल्‍लेही एकमेकांवर करण्यात आले.  आता हे दिग्गज नेते एकत्र येऊ शकत नाहीत, या आनंदात असलेले विरोधक काल शनिवारी जालना येथे आरोग्य शिबिरात खा.दानवे व खोतकर या दोघांनी गळाभेट घेतल्यानंतर बुचकळ्यात पडले आहेत.

नगर परिषद निवडणूक निकालाने धसका
दरम्यान, सिल्‍लोड नगर परिषदेच्या निवडणुकीत संपूर्ण ताकद लावूनही भाजपच्या पदरात फारसे काही पडले नाही. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपला चारीमुंड्या चित केले. राज्यात सत्ता असताना आणि अनेक मंत्री सिल्‍लोडला प्रचारासाठी आले तरीही भाजपला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. सिल्‍लोडच्या पराभवाने भाजपला ताळ्यावर आणले. त्यामुळेच दानवे यांनी नरमाईची भूमिका घेत खोतकरांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला, असे बोलले जाते.

आपण साहेब-साहेब म्हणून मरतो राव!
जालना तसेच औरंगाबाद जिल्ह्यात खा.दानवे व खोतकर या दोघांचेही समर्थक कट्टर समर्थक मोठ्या प्रमाणावर आहेत. कालच्या गळाभेटीनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पाऊस पडला. कार्यकर्त्यांमध्ये आपलाच नेता कसा वरचढ आहे, याची जणू स्पर्धाच लागली. रावसाहेबांचे कार्यकर्ते ‘एकच साहेब...’ म्हणून जयघोष करत असताना अर्जुनरावांचे कार्यकर्तेही मागे नव्हते. ‘ढाण्या वाघ.. कशी जिरवली...’ यासह विविध उपमा देऊन खोतकरांचा जयजयकार करीत होते, तर बांधावर असलेल्या कार्यकर्त्यांनी ‘आपलं काही खरं नाही राव... आपण साहेब... साहेब... म्हणून मरतो आणि हे पहा !’ असे म्हणून गळाभेटीचे फोटो पोस्ट केले. ‘यांचे खायचे वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे असतात,’ अशाही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ‘राजकारण म्हणजे काय यांच्याकडून शिकावे,’ असा टोलाही काहींनी लगावला, तर ‘आम्ही दोघे भाऊ भाऊ... मिळून मिसळून खाऊ...‘ असा तिरकस बाणही सोडण्यात आला. नेटकर्‍यांचे हे वाक्युद्ध चर्चेचा विषय बनला आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker