रेल्वे स्थानकाची सुरक्षा वार्‍यावर, बुलेटस्वार रेल्वे स्थानकात गेलाच कसा?

Foto

औरंगाबाद- रेल्वे स्थानक सुरक्षेचा प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रेल्वे स्थानकात चक्‍क बुलेटस्वार प्लॅटफॉर्मवर फिरताना आढळून आला आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. रेल्वे स्थानकात बुलेटस्वार गेलाच कसारेल्वे प्रशासनाचे लक्ष कुठे होतेअसा प्रश्‍न आता सर्वत्र उपस्थित होताना दिसत आहे. 

 

दोन वर्षांपूर्वीही अशाच एका व्यक्तीने प्लॅटफॉर्मवर वाहन आणण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा बुलेटस्वार आढळून आला आहे. बुलेटस्वारावर दंडात्मक कारवाई करून रेल्वे पोलिसांनी १२०० रुपये दंड वसूल केला आहे. मात्र दंडात्मक कारवाई करून काही होणार नाही. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. ऐवढी मोठी बुलेट घेऊन रेल्वे स्थानकात आले हे रेल्वे प्रशासनाच्या लक्षात यायला हवे होते. एक तर प्रवेशद्वारावर कुणीही प्रवाशांची तपासणी करत नाही. याशिवाय याचा फायदा चोर तर घेतातच. यामुळे चोराचे प्रमाणही वाढले आहे. एकाच महिन्यात ५० मोबाईल चोरी झाल्याची नोंद रेल्वे पोलिसांनी केली आहे. यामुळे रेल्वे सुरक्षा वार्‍यावरच असल्याचे स्पष्ट होते. 

 

...तर उद्या बंदुकाही घेऊन जातील 

 

आज प्लॅटफॉर्मवर बुलेट घेऊन जाणारा व्यक्‍ती आढळला. उद्या बुलेट लोडेड बंदुकाही एखादा व्यक्‍ती सहज घेऊन जाऊ शकतो. यामुळे याकडे रेल्वे पोलिसांनी दुर्लक्ष करू नये. सुरक्षेच्या दृष्टीने उपाय योजना करण्याची गरज आहे. 

 

विनातिकीट फिरतात नागरीक

 

नियमानुसार प्रवाशांबरोबर आलेल्या नातेवाईकांनी प्लॅटफॉर्म तिकीट काढणे आवश्यक आहे. परंतु प्लॅटफॉर्म तिकीटही कुणी काढत नाही. याशिवाय रेल्वे प्रशासनही नागरिकांनी प्लॅटफॉर्म तिकीट काढले की नाहीयाकडे लक्ष देत नाही. त्यामुळे कुणीही रेल्वे स्थानकात सहज प्रवेश करत आहे. यामुळे रेल्वे सुरक्षा वार्‍यावरच असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.