हल्क, स्पायडरमॅन, थॉर, आर्यनमॅन यांसारख्या अनेक सुपर हिरोजची निर्मिती करणाऱ्या आणि अमेरिकेतील कॉमिक जगताचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या स्टॅन ली यांना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एका अनोख्या व्यंगचित्रातून आदरांजली वाहिली आहे. राज यांनी स्टॅन ली यांना आदरांजली वाहणारे व्यंगचित्र रेखाटले असून त्यांनी ते ट्विट केले आहे.
जगभरात सुपर हिरोज चे निर्माते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टॅन ली यांनी 13 नोव्हेंबरला अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी निरनिराळ्या पध्दतीतून त्यांना श्रध्दांजली अर्पण केली होती. आता राज ठाकरे यांनींही स्टॅन ली आणि त्यांच्या सुपर हिरोज वर बोलके छायाचित्र रेखाटले आहे.
राज यांनी व्यंगचित्रातून स्टॅन ली जगाला अलविदा म्हणताना दाखवले आहेत. यामध्ये ली यांनी निर्माण केलेले सुपरहिरो पृथ्वीवर दिसत आहेत. 'माझ्या सुपरहीरोंनो, येतो मी. माझ्या पृथ्वीला सांभाळा,' असं म्हणत ली जगाचा निरोप घेताना दिसत आहेत.
राज ठाकरे यांचा व्यंगचित्रांचा छंद सर्वश्रूत आहे. त्यांना देखील कार्टून रेखाटण्याची आवड असून त्यांनी कार्टूनिस्ट होण्याची इच्छा यापूर्वी त्यांनी अनेक मुलाखतींमधून व्यक्त केली आहे.
















