गंगापूरमधील गवळी शिवार येथे चोरट्यांचा धुमाकूळ, चार घरे-मेडिकल फोडले

Foto

औरंगाबाद – नक्षत्रवाडी येथील सशस्त्र दोरोड्याला ४८ तास होत नाही तर, पुन्हा एकदा औरंगाबादमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. गंगापूर तालुक्यातील गवळी शिवार येथे गुरुवारी  मध्यरात्री चार शेतकऱ्यांची घरे व एक मेडिकल दुकान फोडल्याची घटना घडली आहे.  या घटनेने गावकऱ्यांत दहशतीचे वातावरण पसरले आहे.

गंगापूर तालुक्यातील  गवळी शिवार या गावात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांच्या टोळीने धुमाकूळ घातला.  मनोज सुखदेव गवळी, सूर्यभान किसन मांडे, अर्जुन साईनाथ पवार, शांताराम आसाराम केरे या शेतकऱ्यांच्या घरांना लक्ष करीत कडी कोयंडा तोडून घरातील रोख रक्कम आणि एक सोन्याची पोत लंपास केली. गावातील महारुद्र मेडिकलचे शटर उचकटून दुकानातील रोख रकमेवर चोरांनी डल्ला मारला. मात्र एकूण किती रोख व मुद्देमाल चोरट्यानी लंपास केला याचा नेमका आकडा समोर आलेला नाही. ही घटना गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास समोर आली. काही गावकरी शेतातून परत येत असताना काही संशयित गावातून जात असल्याचे  त्यांच्या नजरेस पडले. ही बाब गावकऱ्यांनी पोलिस पाटील बद्रीनाथ  केरे यांना कळवली. केरे यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर उपनिरीक्षक बालक कोळी यांनी पथकासह गावात भेट दिली. त्याच बरोबर श्वान पथक आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. एकाच रात्री चोरट्यांनी चार  शेतकऱ्यांची घरे फोडली.

गवळी शिवार या गावात मागील दोन महिन्यात शेतकऱयांची घरे फोडण्याची ही दुसरी घटना घडल्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. गावात रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे. औरंगाबाद शहरानजीक नक्षत्रवाडी येथे दोन दिवसांपूर्वी सशस्त्र दरोडा पडला होता. मोटरसायकलवरुन आलेल्या दरोडेखोरांनी वृद्ध दाम्पत्याला मारहाण करुन आणि त्यांच्या नातवाच्या मानेवर धारदार गुप्ती लावून पैसे आणि सोने लुटून नेले होते. दरोडेखोर पळून जात असताना तेथून रात्रीची गस्त घालणारे पोलिसांच्या नजरेस पडले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र चोर पळून जाण्यात यशस्वी झाले  होते.