राम मंदिरासाठी गरज पडली १९९२ सारखे आंदोलन करु- आरएसएस

Foto

मुंबई – राम मंदिरासाठी गरज पडली तर १९९२ सारखे आंदोलन करण्याचीही तयारी असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाहक भय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. जोशी यांनी सुप्रीम कोर्टाला आवाहन करताना म्हटले की या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी झाली पाहिजे. आमची इच्छा आहे की मंदिर उभे राहिले पाहिजे. ते म्हणाले, कामात काही अडचणी नक्की आहेत, आम्हाला आशा आहे की कोर्ट हिंदूच्या भावना समजून घेऊन निर्णय घेईल.

मुंबई जवळील उत्तन येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय शिबीराचा शुक्रवारी समारोप झाला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत भय्याजी जोशींना विचारण्यात आले, की ज्या प्रकारे १९९२ मध्ये आंदोलन केले गेले तसे आंदोलन या मुद्द्यावर केले जाणार का? त्यावर जोशी म्हणाले, आवश्यकता पडली तर नक्की केले जाईल.

भय्याजी जोशी म्हणाले, आमची इच्छा होती की दिवाळीच्या आधी शुभ वार्ता येईल, मात्र सुप्रीम कोर्टाने अनिश्चित काळासाठी सुनावणी पुढे ढकलली आहे. राम मंदिराची वाट पाहिली जात आहे. भव्य राम मंदिर व्हावे ही सर्वांची भावना आहे.

जोशी म्हणाले, की राम प्रत्येकाच्या ह्रदयात राहातात. मात्र ते प्रकट मंदिराद्वारे होतात. आमची इच्छा आहे की मंदिर झाले पाहिजे. कामात काही अडचणी नक्की आहेत. आम्हाला आपेक्षा आहे की न्यायालय हिंदूंच्या भावना समजून घेऊन निर्णय घेईल.

सुप्रीम कोर्टाने राम मंदिराची सुनावणी अनिश्चित काळासाठी टाळली आहे, त्यावर जोशी म्हणाले, 'सुनावणी टाळणे हा कोर्टाचा अधिकार आहे. त्यावर आम्ही टिप्पणी करणार नाही. परंतू आपले प्राधान्य वेगळे असल्याचे कोर्टाने म्हटले, त्याचे आम्हाला दुःख झाले आहे. कोट्यवधी हिंदूच्या भावना आणि श्रद्धेच्या मुद्दयावर ज्या पद्धतीने कोर्टाने उत्तर दिले त्यामुळे हिंदूंमध्ये अपमानीत झाल्याची भावना आहे. हिंदूंची आस्था हा कोर्टाचा प्राधान्यक्रम नाही, याचे आश्चर्य वाटते. आम्ही कधी कोर्टाचा अवमान केला नाही, पण कोर्टानेही हिंदूंच्या भावनांचा आदर केला पाहिजे. कोर्टाने या प्रकरणाकडे प्राधान्याने पाहावे.' अशी विनंती जोशींनी केली.