औरंगाबद - सहा महिन्यांपासून सरकारमान्य लॉटरी असल्याचा चकवा देत चक्री जुगार अड्ड्याचा ‘सांजवार्ता’ने स्टिंग ऑपरेशन करून पर्दाफाश केला. यानंतर अवघ्या दोन तासात वाळूज एमआयडीसी पोलिसांनी अवैध धंद्यांवर कारवाई करत गुंड सिकंदरचे सर्व अड्डे उद्ध्वस्त केले.
मागील सहा महिन्यापेक्षा अधिक काळापासून वाळूज औद्योगिक नगरीतील रांजणगाव, बाजाजनगर, महाराणा प्रताप चौक, जोगेश्वरी अशा २० पेक्षा अधिक ठिकाणी खुलेआम चक्री नावाच्या जुगाराचे अड्डे सुरू होते. या बाबत जागरुक नागरिकांनी ‘सांजवार्ता’कडे याची माहिती दिली होती. या अड्ड्याचे स्टिंग ऑपरेशन करून ‘सांजवर्ता ऑनलाईन’ने शुक्रवारी (ता. ३०) बातमी प्रसिद्ध केली होती. यानंतर अवघ्या दोन तासांत पोलिसांनी धरपकड सुरु केली. यामुळे अड्डे चालविणाऱ्या गुंडांचे धाबे दणाणले. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी तब्बल वीस ठिकाणी छापे मारी करुन अवैध जुगार अड्डे बंद केले. ‘सांजवार्ता’ने या अवैध जुगार अड्ड्यांचा पर्दाफाश केल्याने स्थानिक नागरिकांनी ‘सांजवार्ता’ टीमचे आभार मानले आहे.










