सेनेचे दालन दोन महिन्यांपासून तयार
औरंगाबाद-
शिवसेनेला आपल्या गटनेत्याला वर्षभरानंतरही दालन देता आले नाही. दोन महिन्यांपासून
दालन तयार करुन दिले तरी खुर्ची- टेबल देण्यात नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
सध्या मनपात सेना वगळता इतर सर्व पक्षांच्या गटनेत्यांना हक्काचे दालन आहे.
त्याचप्रमाणे आपल्यालाही दालन मिळावे, अशी मागणी सेनेच्या गटनेत्यांनी
वर्षभरापूर्वी केली. त्यानुसार महापौर नंदकुमार घोडेलेंसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी
लवकर दालन मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडे शिफारस केली आहे. मात्र, प्रशासनाकडून
कुठलाच निर्णय घेतला नाही. शेवटी गटनेते मकरंद कुलकर्णी स्वत: खुर्ची लावून बसणार असल्याचे संकेत दिले. त्यावर प्रशासनाकडून काय कारवाई
करण्यात येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
वर्षभरापूर्वी सेनेच्या गटनेतेपदी मकरंद कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर काही दिवसांतच कुलकर्णी यांनीही आपल्याला दालन मिळावे, अशी मागणी लेखी स्वरुपात महापौरांकडे केली, महापौरांनी त्यावर शेरा मारुन तशा सूचना दिल्या. काही महिन्यानंतर पालिका प्रशासनाने एका अधिकाऱ्यांच्या रिकाम्या झालेल्या दालनाची जागा निश्चित केली, त्यात आवश्यक दुरुस्तीचे काम हाती घेतले. परंतु आता वर्ष उलटले तरी कुलकर्णी यांना दालन मिळालेले नाही. त्यामुळे सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.