सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय मुलांच्या वसतिगृहात, विद्यार्थ्यांच्या जेवणात पुन्हा आढळल्या अळ्या

Foto

पैठण- येथील उद्यान रोडवरील हॉटेल ङ्गपार्क वेफ शेजारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय शासकीय मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वारंवार निकृष्ट जेवण दिले जात असून याकडे वरिष्ठ अधिकारी डोळेझाक करीत असल्यामुळे पुरवठादाराची मुजोरी वाढली आहे. दोनच महिन्यांपूर्वी याच वसतिगृहात जेवणात अळ्या आढळून आल्या होत्या. आज सकाळी पुन्हा विद्यार्थ्यांना दिल्या जाणार्‍या भात, वरण व सफरचंद, वांगी यामध्ये अळ्या आढळून आल्या आहेत.

 

येथील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर  मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात ७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, ७५ विद्यार्थ्यांपैकी ३५ विद्यार्थी वसतिगृहात राहतात. या विद्यार्थ्यांनी वसतिगृहात निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याची तक्रार आमदार संदिपान भुमरे यांना घेराव घालून केली होती. या तक्रारीवरून आ. भुमरे यांनी तहसीलदार महेश सावंत यांना वसतिगृहाची पाहणी करून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार तहसीलदार महेश सावंत यांनी वसतिगृहात प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली होती. त्यांना विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवण अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले होते. करपलेल्या पोळ्या, भाजीपाला, सडके कांदे (अळ्या झालेले), जंतू असलेले दूषित पाणी वापरण्यात येत असल्याचे आढळून आले. तसेच विद्यार्थ्यांना सडकीफळे (सफरचंद) देण्यात आल्याचे पाहणीत आढळले होते. 

 

तहसीलदार सावंत यांनी स्वतः या वसतिगृहाची तपासणी करून पंचनामा केला व कर्मचार्‍यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर काही दिवस विद्यार्थ्यांना चांगले जेवण देण्यात आले. मात्र, पुन्हा मागचे पाढे सुरू झाले. आज सकाळी भात, वरण व सफरचंद, वांग्यामध्ये पुन्हा अळ्या आढळून आल्या. या बाबतीत वसतिगृहाचे गृहपाल पवार यांना विचारले असता, आपण फेडरेशनकडे पुरवठादाराची लेखी तक्रार आज दाखल करत असल्याचे त्यांनी सांजवार्ताशी बोलताना सांगितले.


 

 

 

 

 

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker