गंगापूर (प्रतिनिधी) : नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथे अधिक मासानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भागवत कथा व कीर्तन महोत्सवासाठी भाविकांच्या सोयीसाठी विशेष एसटी बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुरुवार दि. २१ मेपासून या धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ होत असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
राजस्थानातील जयपूर येथील गोवत्स राधाकृष्ण महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले असून, या कालावधीत कीर्तन महोत्सव तसेच दत्त लक्ष्मी यागाचेही आयोजन करण्यात आले आहे. गुरुवर्य भास्करगिरी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दि. २१ ते २८ मे दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी गुरुवारपासून दररोज सकाळी ७ वाजेपासून देवगडसाठी एसटीच्या चार विशेष फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच भाविकांच्या प्रतिसादानुसार बससेवेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
-- अडचण आल्यास संपर्क करावे --
भागवत कथा व महोत्सवादरम्यान कोणत्याही भाविकाला अडचण आल्यास त्यांनी देवगड संस्थांशी अथवा मोबाईल क्रमांक ९९२२१९२९९४ वर संपर्क साधावा, असे आवाहन देवगड संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी देवगड येथील भागवत कथा व दत्त महायागासाठी विशेष बसगाड्यांचे गंगापूर आगारातर्फे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या बससेवेचा लाभ घ्यावा.
विजय बोरसे, आगार प्रमुख, गंगापूर














