अयोध्या- राम मंदिर उभारणीवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका स्वीकारली असून, शनिवारी (ता.२४) दुपारी ते विशेष विमानाने सहकुटुंब अयोध्येत दाखल झाले. राम मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी काही हिंदुत्ववादी संघटनांसह शिवसेना रविवारी (ता.२५ ) अयोध्येत एकत्र येणार आहेत. याच दिवशी विश्व हिंदू परिषदेने धर्मसंसदेचे आयोजन केले आहे. राम मंदिर प्रश्नावरून पुन्हा राजकारण तापू लागले असून, अयोध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. अयोध्या व परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यामुळे अयोध्येला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
राम मंदिर उभारण्याबाबत भाजप सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्या दौरा करत आहेत. इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण ठाकरे कुटुंबाने अयोध्या वारीच्या निमित्ताने राजकीय सीमोल्लंघन केले. उद्धव ठाकरे यांचा दौरा, शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनांतर्फे होणारा कार्यक्रम व विहिंपने आयोजित केलेली धर्मसंसद या सार्या पार्श्वभूमीवर अयोध्येत तणावाचे वातावरण आहे.
दोन दिवसांत अयोध्येत कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून केंद्रीय राखीव पोलिस, राज्य पोलिस आणि अन्य निमलष्करी दलांच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्या आणि परिसरात जमावबंदी लागू केली आहे. वादग्रस्त रामजन्मभूमीच्या विद्यमान स्थितीत कोणीही बदल करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना तात्काळ रोखण्यात यावे, असे आदेश सुरक्षा दलांना सरकारकडून देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अयोध्येत ब्ल्यू, यलो आणि रेड असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ड्रोन कॅमेर्याच्या माध्यामातून येथील प्रत्येक हालचालीवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे
उद्धव ठाकरेंचा अयोध्येतील कार्यक्रम
उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे विशेष विमानाने शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईहून अयोध्येच्या दिशेने रवाना झाले. दुपारी २ वाजता ते फैजाबाद विमानतळावर दाखल झाले. नंतर ठाकरे हे लक्ष्मण किला येथे साधूसंतांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास शरयू आरती करणार आहेत. रविवारी (२४ नोव्हेंबर) सकाळी ९ वाजता उद्धव ठाकरे कुटुंबासह रामलल्लाचे दर्शन घेतील. तेथे एका सभेलाही ते संबोधित करतील.
मुस्लिम कुटुंबांचे स्थलांतर
अयोध्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आलेली असतानाही विश्व हिंदू परिषदेने मुस्लिम वस्त्यांमधून मोठा रोड शो केला आणि याद्वारे रविवारी होणार्या धर्मसंसदेला आपला पाठिंबा जाहीर केला. विहिंपच्या रोड शो च्या वेळी कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अनुचित प्रकार घडण्याच्या भीतीने काही मुस्लिम कुटुंबे आपली घरेदारे तात्पुरती सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रयाला गेली आहेत. अयोध्येत नेमके काय घडणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.