खुलताबाद, (प्रतिनिधी) : तालुक्यातील कसाबखेडा गावाजवळ विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८) खुलताबाद घडली. गोरख बाबूराव जाधव (वय ३५, रा. कसाबखेडा) असे मृताचे नाव आहे. धुळे-सोलापूर महामार्गावरील कसाबखेडा शिवारात गोरख जाधव विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करत होते.
त्याचवेळी अचानक वीजपुरवठा सुरू झाल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. ते खांबावरून खाली कोसळून गंभीर जखमी झाले. त्यांना छत्रपती संभाजीनगर - येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महावितरणच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गोरख जाधव अधिकृत कर्मचाऱ्यांऐवजी झिरो वायरमनकडून धोकादायक कामे करून घेतली जात असल्याचा आरोप यावेळी ग्रामस्थांनी केला.
या दुर्घटनेला जबाबदार कोण, संबंधित कामासाठी आवश्यक सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, वीजपुरवठा सुरू होण्यापूर्वी आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती का, याची चौकशी करून दोर्षीवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.












