औरंगाबाद - जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पैठण, गंगापूर, औरंगाबादसह इतर काही तालुक्यात पाण्याचेे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. सतत कमी होत गेलेले पर्जन्यमान आणि बेसुमार पाणी उपसा यामुळे सिंचन तलाव कोरडेठाक पडले आहेत तर भूगर्भातील पाणी पातळी प्रचंड खाली गेली आहे. याचा फटका यंदाच्या दुष्काळात बसतो आहे. पैठण तालुक्यातील अंतरवाली तांडी या गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी टँकरच्या तब्बल ११० किलोमीटरचा फेरा मारावा लागत आहे. यावर्षी जिल्ह्यात केवळ ५२ टक्के पाऊस झाला आहे. काही तालुक्यात खरिपाची पेरणी होऊ शकली नाही एवढी परिस्थिती गंभीर आहे. गंगापूर तालुक्यात पावसाळ्यातील चारही महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला. वैजापूर, सिल्लोड तालुक्यातही प्रचंड पाणीटंचाई जाणवते आहे. औरंगाबाद तालुक्यात काही गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. सिल्लोड तालुका तीव्र पाणीटंचाईच्या फेऱ्यात आहेत. पाणी पातळी खोल गेली आहे. संपूर्ण जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करताना परिसरातील विहीर अधिग्रहीत करून त्याद्वारे टॅंकर भरल्या जाते. मात्र टंचाईग्रस्त गावांत जवळील वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरातील विहिरीही कोरड्या पडल्या आहेत. गतवर्षी २२ ते २७ किलोमीटर अंतरावर मिळणारे पाणी या वर्षी तब्बल ४५ ते ५० किलोमीटर वरून आणावे लागत आहे. काही गावांना तर टँकरला तब्बल एकशे दहा किलोमीटरचा फेरा करावा लागत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाने दिलेल्या
माहितीनुसार पैठण तालुक्यातील अंतरवाली तांडी या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी
टॅंकरला तब्बल ५५ किलोमीटर दूर जावे लागते. म्हणजे एक टँकर
११० किलोमीटरचा फेरा
करते. याच तालुक्यातील कडेठाण बुद्रुक या गावाला ४६ किलोमीटरहून,
रांजणगाव दांडगा
गावाला ४५,
कडेठाण खुर्द या
गावाला ३६ किलोमीटर आणि
सुलतानपूर या गावांना ३६ किलोमीटर अंतरावर टॅंकर भरून आणावे लागते.
औरंगाबाद तालुक्यातही परिस्थिती गंभीर आहे. तालुक्यातील गाडी वाट व तांडे या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकरला ९० किलोमीटरचा फेरा करावा लागतो आहे. कोळघर घोडेगाव या गावांसाठी ८० किलोमीटरचा फेरा टॅंकरला करावा लागत आहे. सांजखेडा या गावाला ४० किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागते. कवडगाव -जालना आणि कवडगाव -अंबड या गावांना पाणी पुरविण्यासाठी टँकरला तब्बल ७० किलोमीटरचा फेरा करावा लागत आहे. अशाच प्रकारे जोडवाडी या गावालाही तब्बल ७० किलोमीटरचा फेरा टॅंकरला करावा लागतो. गंगापूर वैजापूर सिल्लोड या तालुक्यातही पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. गावे, वस्त्या, तांड्यावरील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी टॅंकरला किमान सत्तर ते ऐंशी किलोमीटर फेरा करावा लागत आहे.
६३ कोटींची तरतूद
जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा करण्यासाठी तीन टप्प्यात नियोजन केले असून १ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या दरम्यानच्या काळात पाणी टंचाई असलेल्या गावांना तातडीने टॅंकर सुरू करण्यात येत आहेत. १ जानेवारी ते ३१ मार्च या दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे.त्याचबरोबर १ एप्रिल ते ३० जून या दरम्यान तीव्र पाणीटंचाई भासू शकते. अशा वेळी प्रशासन आकस्मिक निधीची व्यवस्थाही करण्याची शक्यता आहे. यावर्षी पाणी टंचाईचा आराखडा ६३ कोटी रुपयांचा असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
टँकर मालक नाराज, दर वाढवून देण्याची मागणी
दरम्यान शासनाने २०१२ सारी ठरवलेले
किलोमीटरचे दर आजही तेवढेच आहेत. गेल्या पाच-सहा वर्षात च्या किमती प्रचंड
प्रमाणात वाढल्या. मात्र टॅंकरचे प्रतिकिलोमीटर दर वाढलेले नाहीत. सध्या एक रुपया ९० पैसे प्रति
किलोमीटर या दराने टँकरचालकांना पैसे दिले जातात. तर
१००० लिटरसाठी १४८ रुपये प्रति
दिवशी भाडे दिले जाते. गेल्या सहा वर्षांपासून शासनाने या दरात वाढ केली नाही.
यावर्षी तीव्र पाणीटंचाई लक्षात घेता शासनाने तातडीने दरवाढ करावी,
अशी मागणी टॅंकर
मालकांकडून होत आहे.










