औरंगाबाद- शहरातील बँकिंग क्षेत्र पार कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे. राजकीय दबाव, कार्यकर्त्यांची मुजोरी, जातीय तेढ यासह अनेक कारणांनी बँक अधिकाऱ्यांना कामच करणे अवघड झाले आहे. बोगस कर्ज प्रकरणांचा दबाव आर्थिक चावी असलेल्या अधिकाऱ्यांना सहन होण्यापलीकड चा झाला आहे. तिजोरीची चावी हिसकावून घेण्याचेच तेवढे बाकी आहे, असे मत बँक अधिकारी खासगीत व्यक्त करतात.
त्यामुळे अंदमानात पाठवले तरी चालेल, औरंगाबाद शहरात बँक मॅनेजर म्हणून नोकरी नको, अशी कळकळीची विनंती काही बँक अधिकारी वरिष्ठांकडे करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी बँक अधिकारी महासंघाचे देवीदास तुळजापूरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बँक अधिकाऱ्यांच्या व्यथा मांडल्या. मुद्रा कर्ज योजनेत 90 टक्के प्रकरणे बोगस आहेत. बोगस प्रकरणे मंजूर करण्यासाठी बँक मॅनेजरला धमकावून मंजूर करून घेण्यात येत आहेत. शहरातील प्रत्येक बँक शाखेत सर्रास मुजोरी वाढली आहे. कुणीही येतो संघटनेचे नाव सांगतो आणि मॅनेजर वर दबाव टाकतो, असा प्रकार सुरू आहे. या प्रकाराने बँकेचे कोट्यवधी रुपये चुकीच्या हातात गेले आहेत. बँक अधिकाऱ्यांना सतत तणावाचा सामना करावा लागतो. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रकाराचा आता कडेलोट झाला आहे.
प्रसंगी ते जिवावर
बेतू शकते : तुळजापूरकर
या बलवान लोकविरुद्धची लढाई सोपी नाही
प्रसंगी जीवावर बेतू शकते अशी शंका व्यक्त
करीत तुळजापूरकर यांनी संघटनेच्या माध्यमातून या प्रकाराविरुद्ध लढण्याची तयारी
केली आहे. काही बँक अधिकारी
भ्रष्टाचार करीत असतीलही मात्र प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या जीवावर बेतलेल्या या
संकटाचा सामना करण्याचा मनोदय तुळजापूरकर यांनी व्यक्त केला.
जातीवाचक तसेच
विनयभंगाच्या तक्रारीची धमकी.
बोगस कर्ज प्रकरणे
मंजूर करण्यासाठी बँक अधिकाऱ्यांना निरनिराळ्या प्रकारे धमकावण्यात येते. अनेकदा
जातीवाचक कायद्याचा धाक दाखविला जातो तर
विनयभंगाच्या प्रकरणात अडकवण्याचीही धमकी दिली जाते. अशा प्रकाराला अधिकारी
घाबरतात नको ते झंझट बोगस प्रकरणे मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात. यावर तोडगा
काढण्याची वेळ आली आहे असे तुळजापूरकर म्हणाले.
अंदमानही चालेल.
औरंगाबाद येथील
बँकांमध्ये काम करणे किती अवघड आहे याचा प्रत्यय अधिकाऱ्यांना येतो आहे. त्यामुळे
येथे बँक अधिकारी म्हणून काम करण्यास कोणीही तयार नाहीत. चक्क अंदमानात पाठवा
मात्र औरंगाबादेत नको अशी अशा गयावया अधिकारी करताना दिसतात.