“सविस्तर अहवाल पाठवा…केंद्र सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार, अमित शाहा यांचे आश्वासन

Foto
शिर्डी : राज्यातील मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच केंद्र सरकार देखील शेतकऱ्यांना काही मदत जाहीर करणार का? असा सवाल विरोधत विचारत आहेत. यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत मोठं विधान केलं आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारला पंचनाम्याचा सविस्तर अहवाल पाठवावा, त्यानंतर पंतप्रधान मोदी लगेचच मदत जाहीर करतील, असं आश्वासन अमित शाह यांनी प्रवरालोणी येथील कार्यक्रमात बोलताना दिलं आहे.

“आज प्रवरानगरमध्ये आलो आहे. खरं तर ही भूमी सहकार क्षेत्रातील पंढरी मानली जाते. याचं मूळ कारण हे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आहेत. त्यांनी त्यांचं सर्व जीवन हे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित केलं. याबाबत मी सविस्तर बोलणारच आहे. मात्र, या वर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ६० लाख हेक्टर पेक्षा जास्त शेतीचं नुकसान झालेलं आहे. या २०२५-२६ वर्षांसाठी केंद्र सरकारने शेअर्सच्या माध्यमातून ३१३२ कोटी महाराष्ट्र सरकारला दिले आहेत. त्यामधील १६३१ कोटी रुपये एप्रिलमध्ये देण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं आहे”, असं अमित शाहांनी म्हटलं आहे.

“शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारही उपाययोजना करत आहे. २२१५ कोटींचा रिलीफ फंड महाराष्ट्र सरकारने दिला आहे. त्यामध्ये १० हजार रुपयांची प्रत्येकी रोख मदत आणि २५ किलो धान्य महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येत आहे. तसेच कर्जमाफीच्या होणाऱ्या वसूली देखील रोखण्यास सांगण्यात आलेलं आहे”,असंही अमित शाह म्हणाले आहेत.

“महाराष्ट्र सरकामधील हे त्रिमुर्ती आहेत, यातील कोणीही व्यापारी नाही. पण हे तिघेही व्यापाऱ्या पेक्षा कमी नाहीत. मला पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी बोलवलं आणि विचारलं की केंद्र सरकार महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय करेल? देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी कालच माझ्याबरोबर एक महत्वाची बैठक केली. तेव्हा मी पंतप्रधान मोदींच्या वतीने त्यांना आश्वासन दिलं की महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या नुकसानीचा सविस्तर अहवाल पाठवावा. पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांसाठी मदत करण्याला जराही वेळ लावणार नाहीत, ते मदत जाहीर करतील. कारण महाराष्ट्राच्या जनतेने शेतकऱ्यांचं हित जोपासणारं सरकार निवडून दिलेलं आहे”, असं अमित शाह म्हणाले आहेत.